
दुर्घटना टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांवरील ‘भार’ कमी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामध्ये पुलांवरील वजनदार मटेरियल काढून पृष्ठभागाची मास्टिक अस्फाल्टने (डांबरचा थर) डागडुजी केली जाणार आहे. यासाठी पालिका 14 कोटी 40 लाख रुपयांचा खर्च करणार असून पुढील 9 नऊ महिन्यांत 16 पुलांचे काम केले जाणार आहे.
अंधेरीतील गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. शहरातील पादचारी आणि रेल्वे पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर 29 पूल धोकादायक असल्याचे समोर आले. तर अनेक पुलांची दुरुस्ती सुचवण्यात आली. काही पुलांवरील भार वाढला असल्याने तो भार कमी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्यानुसार पालिका 16 पुलांची दुरुस्ती करणार आहे. पुलांवरील पृष्ठभागाची मास्टिक अस्फाल्टने (डांबरचा थर) डागडुजी केली जाणार आहे. रेल्वे पुलांवरील मार्गिकेचा थर पूर्णपणे काढून, क्रॅपिंग करून त्यावर मास्टिक अस्फाल्टचे थर टाकले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने शाह आणि पारीख या कंत्राटदाराची निवड केली असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
या पुलांची डागडुजी
बेलासीस रेल्वे पूल, डायना रेल्वे पूल, फ्रेंच पूल, ग्रँटरोड पूल, केनेडी पूल, सॅण्डहर्स्ट पूल, भायखळा रेल्वे पूल, प्रीन्सेस स्ट्रीट पूल, महालक्ष्मी रेल्वे पूल, प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील कॅरोल पूल (एलफिन्सटन), चिंचपोकळी रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील पूल, करीरोड स्टेशनच्या उत्तरेकडील रेल्वे पूल, वडाळा रेल्वे स्टेशन जवळील नाना फडणवीस पूल, जीटीबी नगर रेल्वे पूल, माटुंगा पश्चिम रेल्वेजवळील टी. एच. कटारिया पूल, दादरच्या मध्य व पश्चिम रेल्वेवरील टिळक पूल.
अशी आहे स्थिती
‘आयआयटी’ मुंबई व तज्ञांच्या मदतीने शहरातील पादचारी आणि रेल्वे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या ऑडिट दरम्यान 29 पूल अतिधोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला. या 29 पैकी 8 पूल पाडण्यात आले आहेत. 12 पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही पुलांचे काम पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून केले जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार सुचवलेल्या उपाययोजनांनुसार आता पुलांवरील भार कमी करण्यात येणार आहे.


























































