अडीच लाख रुपयांची नोकरी सोडून कंपनीचा उपाध्यक्ष बनला ‘चोर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजण चुकीचे मार्ग स्वीकारतात व गुन्हेगारीकडे वळतात. अशीच काहीशी घटना मुंबईतील वाशी येथे घडली आहे. एका मोठ्या आयटी कंपनीत उपाध्यक्ष असलेल्या सुमित सेन गुप्ता या व्यक्तीला कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा कमवायचा होता. यामुळे त्याने अडीच लाखाच्या नोकरीला लाथ मारत चक्क गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला व तो कार चोरीबरोबरच सोनसाखळी चोर बनला. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सुमित एका नामांकित आयटी कंपनीचा उपाध्यक्ष होता. दर महिन्याला अडीच लाख रुपये पगार तो कमवत होता. पण दिवसभर कष्ट करणे त्याला मान्य नव्हते. यामुळे पाच वर्षापूर्वी त्याने नोकरी सोडून दिली. पण नोकरी सोडल्यामुळे त्याची आर्थिक गणित चुकली. त्यातूनच त्याने मग कार चोरीबरोबरच सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे पत्नीबरोबर खटके उडू लागले. यातूनच 2015 साली पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हापासून तो तणावात होता. सुमितने 12 डिसेंबरला एका महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी लंपास केली होती. त्यानंतर पोलिसांनी सुमितला व त्याच्या एका साथीदाराला अटक केली. चौकशीत सुमित उच्चशिक्षित असून त्याने मुंबईतील एका नामांकित कॉलेजमधून इंजिनियरिंगची पदवी मिळवल्याचे समोर आले.