
सामना प्रतिनिधी । मुंबई
पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून या खड्डय़ातून वाहनचालकांना दररोज खडतर प्रवास करावा लागत आहे. दरवर्षी महामार्गाची हीच स्थिती असल्यामुळे हायकोर्टाने यासंदर्भात राज्य सरकारला फैलावर घेत लवकरात लवकर खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाच्या आदेशाची दखल घेत मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजवू अशी हमी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारने आज न्यायालयाला दिली.
पनवेल ते दोडामार्गपर्यंत महामार्गाची वाताहत झाली आहे. यासंदर्भात ऍड. ओवीस पेचकर यांनी याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली.
– आज हायकोर्टाने ५ सप्टेंबरपर्यंत किती खड्डे बुजविले, किती खड्डय़ांचे काम अपूर्ण आहे त्याबाबतचा प्रगती अहवाल १० सप्टेंबर रोजी सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले व १२ सप्टेंबरपर्यंत याबाबतची सुनावणी तहकूब केली.


























































