कोकणात निघालेल्या एसटी बसचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू; 19 जखमी

कोकणात निघालेल्या एसटी बसचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. एसटी बसची कंटेनरला पाठीमागच्या बाजुने धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 19 गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर बस मुंबईहून राजापूरच्या दिशेने निघाली होती. माणगावजवळ असणाऱ्या रेपोली येथे पहाटे साडे चारच्या सुमारास एसटी बसने कंटेनरला पाठीमागच्या बाजुने जोरात धडक दिली. यामुळे बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पहाटेची वेळ असल्याने अनेक प्रवासी साखरझोपेमध्ये होते. बस अचानक कंटेनरवर धडकल्याने प्रवासी पुढच्या सीटवर आदळले. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर काही वेळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र काही वेळानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.