
मुंबई गोवा महामार्गावरील घाटांमध्ये सध्या भर पावसात वाहनांना आग लागण्याच्या घटना पाहावयास मिळत आहेत. महामार्गावरील परशुराम घाटात धावत्या मालवाहू ट्रकला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी कशेडी घाटात पुन्हा एका मालवाहू टेम्पोला आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मनुष्यहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटातील धामणदेवी गावानजीक घाट चढणाऱ्या मालवाहू आयशर टेम्पोला सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून उडी मारल्याने जीवितहानी टळली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामरान मुखत्यार खान हा आपल्या ताब्यातील माल भरलेला आयशर टेम्पो वापी ते गोवा असा घेऊन चालला होता. सोमवारी सकाळी हा टेम्पो कशेडी घाट चढत असताना धामणदेवी गावाजवळ आला असता टेम्पोच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. चालक कामरान याच्या हे लक्षात येताच त्याने गाडीला बाजूला घेऊन, तो टेम्पोमधून बाहेर पडला. त्यानंतर टेम्पोच्या केबीनने पेट घेतला. महामार्गावर पेट्रोलिंग करणारे वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खेड आणि महाड अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संपूर्ण टेंम्पो आगीच्या भक्षस्थानी पडला होता. एक दिवसाआड महामार्गावरील परशुराम आणि कशेडी घाटात वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्याने व्हॅनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.





























































