अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर यशस्वीरीत्या स्थापित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम हे शनिवारी (दिनांक 2 डिसेंबर 2023) मध्यरात्रीनंतर ते आज (दिनांक 3 डिसेंबर 2023) पहाटे या कालावधीत पार पडले. त्यावेळी गर्डर स्थापन करण्याचा शुभारंभ आमदार साटम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली होण्याची शक्यता आहे.

गोखले पुलासाठी गर्डर स्थापित करणे हे अभियंत्रिकी दृष्‍टया अत्यंत आव्हानात्‍मक असे काम आहे. पश्चिम रेल्‍वे प्रशासनाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्‍वेने निर्देश केल्‍याप्रमाणे मे. राईट्स लि. यांच्‍या तांत्रिक पर्यवेक्षणाअंतर्गत हे काम प्रगतिपथावर आहे. रेल्‍वे सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासूनच रेल्‍वे वाहतूक व पॉवर ब्लॉकच्या कालावधीत, रेल्वे भूभागात पहिल्‍या टप्‍प्‍यातील गर्डर आज (दिनांक 3 डिसेंबर 2023) मध्यरात्री रेल्वे भागात यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. नियोजित 75 टक्के अंतर कापून तेथे गर्डर स्थापित करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात आज यश आले. हा महत्वाचा टप्पा पार पडल्याने उर्वरीत अंतरावर गर्डर स्थापनाही अल्पावधीत आणि सुलभतेने करता येणार आहे. तर येत्या पंधरवड्यात हा गर्डर 14 मीटर उत्तरेला सरकवणे आणि नंतर तो 7.5 मीटर खाली आणणे ही कामे नियोजित करण्यात आली आहेत.

रेल्वे परिसरातील 7.5 मीटर उंचीवरून पूल खाली आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने 11 दिवसांचा ब्लॉकचा कालावधी मंजूर केला आहे. पश्चिम रेल्वेच्या विशेष ब्लॉकमध्ये दररोज रात्रीच्या वेळेतील तीन तासात सरासरी 550 मिमी इतक्या प्रमाणात गर्डर हा खाली आणणे शक्य होईल. येत्या काही दिवसात हा गर्डर उत्तर दिशेला सरकवून त्यानंतर टप्प्याटप्प्याने खाली आणण्यात येईल. हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक असणार आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात येईल, नियोजित उंचीवर खाली आणल्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली.

· पुलाची लांबी– रेल्वे भूभागात– 90 मीटर

· रेल्वेबाहेर– पूर्वेस 210 मीटर, पश्चिमेस– 185 मीटर

· पुलाची रुंदी– (रेल्वे भूभागात)– 13.5 मीटर

· रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह- 12 मीटर (दोन्ही बाजूस)

· एकूण रुंदी– 24 मीटर

गोपाळ कृष्ण गोखले पुलाबाबत पूरक माहिती-

– अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणा-या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये सुमारे 1275 टन वजनाचे दोन गर्डर (तुळया) स्थापन करण्याचा कामाचा समावेश आहे.

सदर गर्डरच्या भागांची (स्ट्रचरल मेंबर्स) फॅब्रिकेशन अंबाला येथील कारखान्यात करण्यात येत आहे. तयार केलेल्या सुट्या भाग (मेंबर्स) ची जुळवाजुळव (असेंब्ली), सुमारे 13-14 मीटर उंचीवर, रेल्‍वे रुळाच्‍या पूर्व बाजूस तात्‍पुरत्‍या संरचना व्‍यवस्‍थेवर करण्यात आलेली आहे.

– गर्डरची उभारणी करुन रेल्‍वे रुळावर गर्डर लॉंचींग करणे / उत्‍तरे कडील पहिल्‍या टप्‍प्‍यातील नियोजित रेषेत (Alignment) सरकवणे (Side sleeving), त्‍यानंतर सुमारे मीटर खाली आणणे (lowering) अशा प्रकारे पहिल्‍या टप्‍प्‍यातील गर्डरची उभारणी करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर, दुस-या टप्‍प्‍यातील गर्डरची त्याच तात्‍पुरत्‍या संरचना व्‍यवस्‍थेवर उभारणी करण्‍यात येईल.

– पश्चिम रेल्वे प्रशासनाने जुना पूल पूर्णपणे तोडून 28 मार्च 2023 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे प्रकल्पाची जागा हस्तांतरित केली. पश्चिम रेल्‍वे प्रशासनाद्वारे सदर पुलाची जागा हस्‍तांतरित केल्‍यानंतर 1 एप्रिल 2023 पासून पुलाच्‍या पुनर्बांधणीचे काम सुरु करण्‍यात आले.

– गोखले पुलाच्या सुमारे 1300 टन वजनी गर्डरचे लॉंचिंग करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि पुलाचा गर्डर सरकवल्यानंतर तो 7.5 मीटर खाली आणणे, हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम हे राईट्स या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

पहिल्या गर्डरचे काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने हे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याची जबाबदारी राईट्स या रेल्‍वे मंत्रालयाच्‍या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांस देण्यात आलेले आहे.

– एखाद्या पुलाच्या कामात 7.5 मीटर उंचीवरून सुमारे 1300 टन वजनी गर्डर खाली विशिष्ट उंचीवर आणणे, अशाप्रकारचा हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. या प्रक्रियेतील सर्व टप्‍पे अतिशय काटकोरपणे करणे, रेल्‍वे सुरक्षेच्‍या निकष इत्‍यादी बाबींमुळे कामाच्‍या प्रगतिपथावर मर्यादा येतात. त्यामुळे सदर तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

रेल्वेच्या साधारणपणे एक तासाच्या ब्लॉकमध्ये गर्डर फक्त 15 सेंटीमीटर इतकाच खाली आणता येईल. त्यामुळे गोखले पुलाच्या या अवाढव्य 1300 टन वजनी गर्डरकरिता 7.5 मीटर खाली उतरवण्याच्य 7.5 कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असू शकतो.

अशाप्रकारचे अभियंत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक काम पश्चिम रेल्‍वे प्रशासनाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्‍वेने निर्देश केल्‍याप्रमाणे मे. राईट्स लि. यांच्‍या तांत्रिक पर्यवेक्षणाखाली प्रगतिपथावर आहे.

– एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळया अंथरून सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल.

– दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे (approach road) चे काम दुसऱ्या कंत्राटदारामार्फत तब्बल 80 टक्के काम देखील पूर्ण झाले आहे. नियोजनाप्रमाणे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत गोखले पुलाच्‍या पहिला टप्‍प्‍याचे काम पूर्ण होऊन सदर पूल हा अंशतः वाहतुकीकरीता खुला करणे अपेक्षित आहे.

-ही सर्व कामे क्रमाने झाल्यानंतरच पूल एका दिशेच्या वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होईल.