मुद्दा- मुंबईला मिळाला जैवविविधता नकाशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रीन ह्युमर या शीर्षकाखालील कामासाठी ओळखल्या जाणाऱया रोहन चक्रवर्ती यांनी मुंबईचा पहिलाच जैवविविधता नकाशा तयार केला आहे. यामध्ये वन्यप्राण्यांची वसतिस्थाने, तिवरांची वने, शहरातील हिरव्या जागा आणि शहरात दिसणाऱया 90हून अधिक प्रजाती दाखवलेल्या आहेत. अशाश्वत विकासामुळे धोक्यात आलेल्या मुंबईच्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी मुंबईकरांनी पृती केली पाहिजे याची आठवण करून देण्याचे काम हा नकाशा करतो.

हा अनोखा नकाशा ‘बायोडायव्हर्सिटी बाय द बे’ या अभियानासाठी तयार करण्यात आला आहे. जैवविविधता जपण्याचा मुद्दा सर्वांसमोर आणण्याच्या हेतूने मुंबईकरांनी मिळून स्थापन केलेल्या मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक या समूहाने हे अभियान सुरू केले आहे.

मुंबईच्या जैवविविधता नकाशाबद्दल रोहन चक्रवर्ती म्हणाले, जैवविविधतेच्या दृश्य संसाधनांची माहिती देऊन मुंबईकर तरुणांना सक्षम करण्याच्या उद्दिष्टाने मी हा नकाशा तयार केला आहे. त्याचप्रमाणे आपण जो नैसर्गिक वारसा जतन केला पाहिजे आणि ज्यासोबत जगले पाहिजे, त्याची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न आहे.

मुंबई हे नाव घेतल्यानंतर एखाद्याच्या डोळ्यापुढे एकतर गगनचुंबी इमारती वा झोपडय़ा किंवा मरिन लाइन्स व वांदय़ालगतचे प्रोमनाड्सच येतात. मात्र, मुंबई जैवविविधतेच्या अनोख्या मिश्रणाने समृद्ध आहे याची आठवण हा नकाशा प्रत्येकाला करून देईल. शहराच्या हृदयस्थानी असलेल्या बिबटयांच्या वर्चस्वाखालील वनांपासून ते समुद्रकिना-यावरील वन्यजीवांपर्यंत, फ्लेमिंगोंच्या फडफडाटाने गुलाबी झालेल्या पाणथळ जागांपासून ते लालजर्द खेकडय़ांनी चमकणाऱया तिवरांपर्यंत सगळे काही मुंबईत आहे.

मुंबईची जैवविविधता राखण्यासाठी शाश्वतता व आधुनिकता हातात हात घालून चालले पाहिजेत अशी मागणी करत, अनेक तरुण मुंबईकर एकत्र आले आहेत. बीएमसीसारख्या प्रमुख संबंधित यंत्रणेशी संवाद या अभियानाद्वारे साधला जाईल. मुंबईतील जैवविविधतेच्या भवितव्याविषयी चर्चा सुरू करण्याची विनंती करणारे पत्र महाराष्ट्र सरकारला लिहिले जाणार आहे.

या आवाहनात पाच कलमांची एक कृती योजना दिली आहे. यात फ्लेमिंगोंचे मुंबईकरांना वाटत असलेले महत्त्व ओळखून त्यांच्या वसतिस्थानांचे संरक्षण करणे, आरेला वन म्हणून मान्यता देणे आणि मुंबईतील हिरवाईचे संरक्षण करणे, कोळी समाजाच्या उपजीविकेसाठी समाजाशी बोलून सहाय्यकारी धोरण सुचवणे आणि मुंबईत उद्याने विकसित करणे व त्यांचे संरक्षण करणे आदींचा समावेश आहे.