
मुंबईत एकेकाळी मराठी नाभिकांची संख्या मोठी होती. लालबाग, परळ, दादर, माहीम, वडाळा, कुलाबा, भायखळा आदी ठिकाणी मराठी नाभिकांचे सलून मोठय़ा प्रमाणात दिसायचे. आता मराठी माणसांच्या या व्यवसायावर परप्रांतियांनी कब्जा केला आहे. उपनगरात तर मराठी नाभिकांचे केशकर्तनालय शोधावे लागते. परंतु किरण रघुनाथ चव्हाण या नाभिक समाजाच्या तरुणाने गेली दोन दशके आपला हा व्यवसाय चिकाटीने टिकवून ठेवला आहे. कोरोना काळात आर्थिक अडचणी येऊनही त्याने हा व्यवसाय पुन्हा सुरू केला असून त्याच्या दुकानात स्त्री-पुरुष दोघांचीही गर्दी असते.
किरणने व्यावसायिक प्रशिक्षण घेतले असून ब्युटी पार्लर असोसिएशनने आयोजित केलेल्या सौंदर्य कला स्पर्धेमध्ये त्याचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे. हेअर ड्रेसिंगचा डिप्लोमा केलेल्या या तरुणाने नुकतेच दहिसर पश्चिमेला विठ्ठल मंदिरसमोर स्वतःचे ‘इमेज 9’ नावाचे हेअर सलून उघडले आहे. या तरुणाच्या हातातील कैची आणि वस्तरा म्हणजे एक सुखद अनुभव असतो. गेल्या काही वर्षांत मल्टीनॅशनल कंपन्यांनी या क्षेत्रात घुसून नव्या स्टाईल व नवे लूक आणले. हेअर स्टाईल बदलून टाकली. किरण ग्राहकांना हव्या त्या स्टाईलने केस कापतो, विविध रंगांमध्ये कलर, ब्लिचिंग फेशिअल, मसाज करतो व चेहरा ‘चिकना चुपडा’ करून ग्राहकांना खूश करतो. नाभिक समाजातील तरुणांनी व्यवसायिक प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू करावा व परप्रांतीयांची मक्तेदारी मोडून काढावी, असे आवाहन किरणने केले आहे.



























































