एस्प्लेनेड इमारत तोडायची की नाही?- हायकोर्टाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोर्ट येथे धोकादायक स्थितीत असलेल्या ऐतिहासिक एस्प्लेनेड इमारतीचे जतन करायचे की ही इमारत जमीनदोस्त करायची त्याबाबत 18 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी हेरिटेज, आर्किटेक्ट तसेच स्ट्रक्चरल इंजिनीयरला दिले.

फोर्ट येथील 155 वर्षे जुनी ऐतिहासिक ‘एस्प्लेनेड मेन्शन’ ही इमारत महापालिकेने  धोकादायक इमारत म्हणून घोषित केली आहे. इमारत कोसळून एखादी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. यासंदर्भात अली मोहम्मद यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती  शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी खंडपीठासमोर बाजू मांडताना जागा मालक तसेच भाडेकरूंनी या इमारतीची डागडुजी करण्यात यावी, अशी विनंती खंडपीठासमोर केली. त्याचबरोबर हेरिटेज विभागानेही या इमारतीचे जतन करावे, अशी भूमिका घेतली आहे.

इमारत जमीनदोस्त करा 

म्हाडाच्या वतीने ऍड. प्रकाश लाड यांनी बाजू मांडली व प्रतिज्ञापत्र सादर करत खंडपीठाला सांगितले की, इमारत पूर्ण धोकादायक झाली असून ही इमारत जमीनदोस्त करण्याबाबतचा अहवाल आयआयटी मुंबईने दिला आहे. त्यामुळे ही इमारत जतन करण्याऐवजी ती तोडण्यात यावी.