लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात! हायकोर्टाची संतापजनक टिप्पणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोजच्या संसारात नवरा-बायकोमध्ये भांडणांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा ही भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचतात. परिणामी संसारातील आनंदच हरवून गेला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात चिंता व्यक्त केली. लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही, तर नरकात बांधल्या जातात, अशी संतापजनक टिप्पणी करीत न्यायालयाने एका ‘भांडकुदळ’ बायकोला झटका देत नवऱयाला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

हुंडय़ासाठी छळ केल्याचा आरोप करीत बायकोने नवऱयाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात नवऱयाने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या नवरा-बायकोत वारंवार या-ना-त्या कारणावरून खटके उडाले, भांडणे झाली. त्यांच्यातील सातत्याच्या भांडणांवर बोट ठेवत न्यायमूर्ती एस. व्ही. कोतवाल यांनी नवऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

कौटुंबिक हिंसाचार आणि छळासंदर्भात नवरा-बायकोने वारंवार केलेल्या तक्रारी आणि उलटतक्रारींची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. या प्रकरणातील नवरा-बायकोने वारंवार भांडून त्यांचे आयुष्य एकमेकांसाठी नरक बनवले आहे. अशा प्रकारच्या लग्नाच्या गाठी नेहमीच स्वर्गात बांधल्या जात नाहीत, असे मत न्यायमूर्ती कोतवाल यांनी व्यक्त केले. अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणारा नवरा आणि तक्रारदार बायको एकत्र का राहत नव्हते, ते एफआयआरवरून स्पष्ट दिसून येते. हे दोघे वारंवार एकमेकांशी भांडत होते, असे नमूद करीत न्यायमूर्तींनी नवऱयाला अटकपूर्व जमीन मंजूर करून दिलासा दिला.

न्यायालय काय म्हणाले?

न्यायालयाने सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात नवरा-बायकोत होणाऱया छोटय़ा-मोठय़ा भांडणांवर चिंता व्यक्त केली. सगळ्या जोडय़ा काही स्वर्गात बांधल्या जात नाहीत. अनेक जोडय़ांमध्ये सातत्याने भांडणे होतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य एकमेकांसाठी नरक बनून जाते, असे नमूद करतानाच लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही, तर नरकात बांधल्या जातात, असे न्यायमूर्ती कोतवाल म्हणाले.

नवऱ्याच्या कोठडीने प्रश्न सुटणार नाही!

न्यायमूर्ती कोतवाल यांनी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेऊन निर्णय दिला. या प्रकरणात नवरा-बायकोने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यावर खटल्याच्या सुनावणीवेळी निर्णय दिला जाऊ शकतो. हा प्रश्न नवऱ्याच्या कोठडीने सुटणारा नाही. मात्र नवऱ्याने चौकशीला सामोरे जावे, असे न्यायमूर्तींनी बजावले. याचवेळी अर्जदार नवऱ्याला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडून देण्याचे निर्देश पोलिसांना दिले.