
राज्यातील वाढत्या गॅस गळतीच्या घटनांची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी चेंबूरच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (आरसीएफ) प्लांटमध्ये गॅस गळतीची घटना घडली तर अलीकडेच तारापूर एमआयडीसीतही गॅस गळती झाली होती. या घटनांबाबत चिंता व्यक्त करत हायकोर्टाने याप्रकरणी स्युमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
चेंबूर तसेच तारापूर एमआयडीसीत झालेल्या गॅस गळतीमुळे सभोवतालच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले असून या वृत्ताची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने गॅस गळतीच्या प्रश्नावर स्युमोटो याचिका दाखल करून घेण्याची तयारी दर्शवली. त्याच अनुषंगाने राज्य सरकारला त्यांनी आतापर्यंत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उचललेली पावले आणि विविध उपाययोजनांबाबत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना बाधित भागांमध्ये पुढील तपासणीसाठी पाठवले जाईल, असे मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणीवेळी नमूद केले.

























































