सेलिब्रिटींना रेमडेसिवीर कसे मिळाले? चौकशी करण्याचे राज्य सरकारला हायकोर्टाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडवर उपयुक्त ठरणाऱया रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना सेलिब्रिटींना परस्पर हे इंजेक्शन मिळाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला या प्रकरणी जाब विचारला. सेलिब्रिटींना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळालेच कसे, असे खडसावत हायकोर्टाने या प्रकरणी चौकशी करण्याचे राज्य सरकारला आदेश दिले.

कोविडसंदर्भात विविध समस्यांप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी कोर्टाला माहिती देताना सांगितले की, रेमडेसिवीरच्या मागणीत घट झाली आहे. हेट्रो व ज्युबिलंट सिप्ला या कंपन्या रेमडेसिवीरचे उत्पादन घेत आहेत. या कंपन्यांकडून अभिनेता सोनू सूद यांचे सूद फाऊंडेशन व आमदार झिशान सिद्दीकी यांनी या दोन कंपन्यांकडून इंजेक्शन मागवले होते. त्यांनी ती विकत घेतली नव्हती किंवा त्याचा साठाही केला नव्हता. इंजेक्शन गरजूंना सहज उपलब्ध होईल यासाठी केवळ दुआ म्हणून काम केले होते. या प्रकरणी राज्य सरकारने त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच संबंधित कंपन्यांनाही नोटीस पाठवल्याचे महाधिवक्तांनी खंडपीठाला सांगितले.