
मुंबईतील ताज हॉटेल हे राष्ट्रीय वारसा असलेली वास्तू असून मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या वास्तूला लक्ष्य करण्यात आले. यात अनेक निरपराध व्यक्तीचा जीव गेला. त्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा यंत्रणा, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला पुन्हा होऊ नये, यासाठी ताज व्यवस्थापनाने हॉटेलसमोरील रस्ता आणि पदपथावर बॅरिकेड्स उभारले असून त्याची सुरक्षा, देखभाल ते करत आहेत. ही नावाजलेली वास्तू देशाचे वैभव असून या राष्ट्रीय वास्तूच्या सुरक्षेसाठी ताज हॉटेलला रस्ता आणि पदपथ वापर शुल्कात पालिकेने सवलत दिली आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. पालिकेत स्थायी समितीत आज झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
कुलाबा येथील ताज हॉटेल हे राष्ट्रीय वारसा असलेली वास्तू आहे. मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या वास्तूला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 31 निरपराध व्यक्तींचा बळी गेला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ताजसमोरील रस्ता आणि पदपथावर बॅरिकेड्स उभारून ताज व्यवस्थापन स्वतःची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था उभारून देखभालही करत आहे. हिंदुस्थानी संरक्षण खाते, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस खाते यांनी ताज व्यवस्थापनाला अशा प्रकारे बॅरिकेड्स लावून सुरक्षा व्यवस्था उभारायला सांगितले. त्यानुसार त्यांनी ही यंत्रणा उभारली. मात्र याबाबत ताजकडून 8 कोटी 75 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश 2015ला तत्कालीन पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र ही राष्ट्रीय वास्तू जतन व्हावी तसेच सुरक्षेच्या कारणास्तव आज स्थायी समितीच्या बैठकीत ताज हॉटेलला रस्ता वापरासाठी 50 टक्के सवलत तर पदपथ वापरासाठी 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात अशी सवलत देऊ नका, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती.
…तर विरोधक जबाबदारी घेतील का?
सुरक्षा यंत्रणांनी सांगितल्यामुळेच ताजने हॉटेलबाहेर रस्ता आणि पदपथावर ही व्यवस्था उभारली आहे. रस्ता आणि पदपथ वापरातील काही रक्कम ताजने भरलीही आहे. मात्र सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले हे बॅरिकेड्स काढून टाकले आणि उद्या या ठिकाणी पुन्हा घातपात झाला तर त्याची जबाबदारी विरोधक घेणार आहेत का? बॅरिकेड्स काढले तर सुरक्षा यंत्रणा ताजवर कारवाई करेल. त्यामुळे ताजची ही वास्तू जपण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
ताज हॉटेलबाबत पालिकेने स्वतंत्र धोरण तयार करावे
ताज हॉटेलला राष्ट्रीय पुरातन वास्तूचा दर्जा असल्यामुळे मुंबईवरील ‘26/11’च्या अतिरेकी हल्ल्यानंतर डिफेन्स आणि मुंबई पोलिसांच्या सुचनेनुसार सुरक्षेच्या दृष्टीने गेटवे ऑफ इंडियासमोरील रस्ता व पदपथ ताज हॉटेलने पादचाऱयांसाठी बंद केले आहे. रस्ता व पदपथ वापराच्या शुल्कातील काही रक्कम ताजने याआधी भरली आहे. असे असताना विरोधक, भाजपकडून नाहक राजकारण केले जात असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. त्यामुळे ताज हॉटेलबाबत पालिकेने स्वतंत्र धोरण तयार करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणात टाटा समूहाला मेहेरबानी दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे जाधव म्हणाले. ताज हॉटेलचा 1903 इतिहास पाहता गेट वे ऑफ इंडियासोबत आपण ताज हॉटेलचेही नाव घेतो. ताज हॉटेल म्हणजे मुंबईचे वैभव आहे. कोरोनाच्या काळात ताज हॉटेलने डॉक्टर-कर्मचाऱयांसाठी सर्वप्रथम खोल्या उपलब्ध करून दिल्या असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.






























































