
पवई येथील आयआयटी मुंबईला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कवच लाभणार आहे. केंद्र सरकारने आयआयटी मुंबईला सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नुकतेच सुरक्षा पाहणीही करण्यात आली. सध्या आयआयटीमध्ये स्वतःचे 100 सुरक्षारक्षक आहेत. केंद्र सरकारने गेल्याच आठवडय़ात राज्य सरकारला आयआयटी मुंबईच्या सुरक्षेबाबत पत्र पाठवले होते. देशातील प्रमुख संस्थांची सुरक्षाव्यवस्था खांद्यावर असलेल्या सीआयएसएफकडे आयआयटी मुंबईचीही जबाबदारी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने अचानक का घेतला याबद्दल कोणीही स्पष्ट केलेले नाही. आयआयटी मुंबईचा 223 हेक्टरचा विस्तीर्ण परिसर पाहता तिथे सीआयएसएफचे किती जवान तैनात करायचे याचा अभ्यास केला जाणार आहे.

























































