
सामना ऑनलाईन । मुंबई
किंग्ज इलेव्हन पंजाबने मोहालीत झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित शर्माची ब्रिगेड सज्ज झालीय. मुंबई इंडियन्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लढत रंगणार असून यावेळी यजमान संघ चौथ्या विजयासाठी तर रविचंद्रन अश्विनचा किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ पाचव्यांदा विजयी होण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल.
आत्मविश्वास उंचावलाय
मुंबई इंडियन्सने मागील दोन लढतींमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज व सनरायझर्स हैदराबाद या दोन फॉर्ममध्ये असलेल्या संघांना पराभूत केले आहे. त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलाय. याचसह कायरॉन पोलार्ड व हार्दिक पांडय़ा यांनी दे दणादण फटकेबाजी करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवल्या आहेत. सध्या तरी हे चित्र आशा निर्माण करणारे असले तरी अव्वल फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही ही खेदजनक बाब. त्यामुळे रोहित शर्मा, क्विण्टॉन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन या फलंदाजांना मुंबई इंडियन्ससाठी किल्ला लढवावा लागणार आहे.
गेल ऍण्ड कंपनीला कसे रोखणार?
वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत विक्रमी कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी लढतींत त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. अल्जारी जोसेफ, जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडोर्फ यांना ख्रिस गेल ऍण्ड कंपनीला रोखावे लागणार आहे. ख्रिस गेल, लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी फलंदाजीत आपला ठसा उमटवला असल्यामुळे उद्या वानखेडे स्टेडियमवर त्यांची जादू चालल्यास आश्चर्य वाटायला नको.
गोलंदाज चमकताहेत
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी आतापर्यंत या स्पर्धेत आपली चमक दाखवलीय. कर्णधार रविचंद्रन अश्विनने सात फलंदाज बाद करीत कर्णधाराला साजेशी कामगिरी केलीय. तसेच सॅम करण, मोहम्मद शमी व मुरुगन अश्विन यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे या सर्व गोलंदाजांवर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी असणार.
आजची आयपीएल लढत
मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब; मुंबई, रात्री 8 वाजता



























































