मुंबईत लहान मुलांसाठी कोविड वॉर्ड; रुग्णालये, जम्बो कोविड सेंटर्स सज्ज, तिसऱ्या लाटेसाठी पालिका सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली असतानाच लहान मुलांना धोका असणारी तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ञांकडून देण्यात आल्यामुळे पालिकेने सतर्कता म्हणून आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

पालिकेच्या चारही प्रमुख रुग्णालयांसह जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी बालरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. शिवाय नव्याने उभारण्यात येणाऱया चारही जम्बो सेंटरमध्येही पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता चांगलीच नियंत्रणात आली आहे. वेगाने केलेल्या चाचण्या, पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आणि प्रभावी क्वारंटाइन यामुळेच रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे काकाणी म्हणाले. कोरोना लढय़ाचा ‘मुंबई पॅटर्न’ देशात सर्वोत्कृष्ट ठरत असल्याने सर्वोच्च न्यायालय, ‘निती’ आयोगानेही कौतुक केले. याचे श्रेय पालिकेची संपूर्ण टीम आणि मुंबईकरांचे मिळालेले सहकार्य यालाच असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

दरम्यान, ‘मुंबई पॅटर्न’चे कौतुक होत असले तरी यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आम्ही संभाव्य तिसऱया लाटेसाठी यंत्रणा सक्षम ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टास्क फोर्सच्या निर्देशानुसार प्लॅनिंग 

कोरोनाच्या तिसऱया लाटेत लहान मुलांना जास्त लागण होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार नेमलेल्या विशेष ‘टास्क फोर्स’च्या निर्देशांनुसार प्लॅनिंग करण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

‘टास्क फोर्स’च्या आतापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार पालिकेच्या केईएम, शीव, नायर या प्रमुख रुग्णालयांसह बीकेसी, दहिसर, नेस्को आदी जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी खास आरोग्य व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्यस्थितीत सर्व नर्सिंग होममध्ये लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. बालरुग्ण वॉर्डसाठी बेडची वेगळी रचना, वॉर्डची खास रचना, सोयीसुविधा तयार करण्यात येतील. या ठिकाणी आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडही तैनात असतील.