कस्तुरबा रुग्णालय अस्वच्छ; वॉर्डात घुशी, मांजरींचा वावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येणाऱया कस्तुरबा रुग्णालयात घाणीचे साम्राज्य असून दिवसाढवळ्या तेथे घुशी, मांजरींचा वावर पाहायला मिळत आहे. एवढेच काय तर क्वारंटाइन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांना आरोग्यदायी आहार मिळत नसल्याचा आरोप करत एका वकिलाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेले मुंबईतील प्रमुख केंद्र कस्तुरबा रुग्णालयात अस्वच्छता पाहायला मिळत आहे. घुशी, मांजरी वॉर्डात सर्वत्र फिरत असून यामुळे येथे उपचार घेणाऱया रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी करत ऍड. सागर कुर्सिजा यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता गरजेची असून रुग्णालय आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे. मात्र ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असलेले रुग्णालयच अस्वच्छ असल्याचे ऍड. कुर्सिजा यांनी आज कोर्टाला सांगितले. एवढेच काय तर स्वच्छतागृहातही अस्वच्छता असल्याची छायाचित्रे त्यांनी खंडपीठासमोर सादर केली. तसेच कस्तुरबाच्या क्वारंटाइन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांना आरोग्यदायी आहार मिळत नसून तेथील डाएट चार्टही त्यांनी खंडपीठाला दाखवला. मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने याची दखल घेत या प्रकरणावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.