
पश्चिम रेल्वे मार्गावरील वाणगाव-डहाणू रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.
पश्चिम रेल्वे मार्गावरील वाणगाव-डहाणू रेल्वे स्थानकादरम्यान डाउन मार्गावर रात्रीच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने या दोन्ही स्थानकादरम्यानची उपनगरीय गाड्यांची सेवा संपूर्णपणे ठप्प झाली आहे. विरार ते डहाणू, दादर ते डहाणू आणि चर्चगेट ते डहाणू या उपनगरीय सेवा पालघर, बोईसर आणि वाणगाव रेल्वे स्थानकातून सुरू करण्यात आल्या आहेत. ओव्हरहेड वायर तुटल्याने उपनगरीय आणि लांब पल्ल्याची रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून लोकल्स ४० ते ४५ मिनिटे तर लांब पल्ल्याच्या गाड्या एक तास उशीराने धावत असून यामुळे यामुळे प्रवाशी, चाकरमानी आणि विद्यार्थी यांचे मोठे हाल झाले. उपनगरीय गाड्या उशीराने धावत असल्याने डहाणू, वाणगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केळवे रोड, सफाळे आणि वैतरणा या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती.
कामावर आणि शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी खोळंबा झालेल्या प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या सोईसाठी लांब पल्ल्याच्या गाडयात प्रवास करण्याची त्यांना मुभा देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. दरम्यान मुंबई सेंट्रल आणि दादर स्थानकातून सुटणार्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
























































