दुकाने सुरू, मात्र ग्राहकांनी फिरवली पाठ! मास्क, सॅनिटायझर बनले अविभाज्य भाग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गेले अडीच महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आज सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली. मात्र, मोठ्या उत्साहाने दुकाने सुरू करूनही ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरवली. दुकानदार आणि सेल्समन तोंडावर मास्क आणि हातात गोल्ज घालून हसतमुखाने स्वागतासाठी तयार होते. सोशल डिस्टनसिंग पाळले जावे, यासाठी दुकानाबाहेर चौकोन आखले गेले. पण दुकानांकडे दिवसभर ग्राहक फिरकले नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने नियम शिथील करायला सुरुवात केली असून आजपासून मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रे तसेच मॉल आणि व्यापारी संकुल वगळून दुकाने सुरू करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे दुकानदारांमध्ये मोठा उत्साह होता. सम आणि विषम नियम पाळून मोजकीच दुकाने उघडण्यात आली. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांमध्ये निरुत्साह जाणवला. जी/उत्तर विभागातील दादर, माहीम आणि धारावीतही प्रतिबंधित क्षेत्रे वगळून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पूर्व आणि दक्षिणेकडील दुकाने तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पश्चिम आणि उत्तर दिशेकडची दुकाने सुरू राहतील. तर अत्यावश्यक सेवा देणारी किराणा माल, औषधे आणि दूध विक्रीची दुकाने सोडून इतर दुकाने रविवारी बंद राहणार आहेत, असे आदेश जी/उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिले. दुकाने उघडल्यामुळे त्याचा फायदा किरकोळ व्यापाऱ्यांना होणार आहे तर ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूसह इतरही वस्तू बाजारात जाऊन खरेदी करता येणार आहे.

सकाळपासून ढगाळ वातावरण

मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणामही ग्राहकांवर झाला. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, सोसाट्याचा वारा आणि पावसाचा दणका मुंबईकरांना बसला होता. त्यामुळे आजचे ढगाळ वातावरण बघून ग्राहक आजपासून सुरू झालेल्या दुकानांकडे फिरकलेच नाहीत.

संध्याकाळी दुकाने लवकर बंद

कोरोना पार्श्वभूमीवर, रात्री 8 नंतर सुरू करण्यात आलेली संचारबंदी कायम आहे. त्यामुळे संध्याकाळी 8 च्या आत दुकानातील कर्मचारी घरी पोहोचावेत, यासाठी काही ठिकाणी दुकाने ५ वाजताच बंद करण्यात आली. त्यामुळे संध्याकाळी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना दुकाने बंद आढळली.

आपली प्रतिक्रिया द्या