
सामना प्रतिनिधी। मुंबई
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला चौथा आणि अंतिम टप्पा सोमवारी पार पडणार आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार गेलेला असताना पहिल्या तीन टप्प्यांत मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पार पाडल्यानंतर आज कधीही न थांबणाऱया मुंबईसह ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक अशा 17 मतदारसंघांत मतदान होत आहे. कडाक्याच्या उन्हात मतदानाचाही पारा चढेल काय, याविषयी औत्सुक्य आहे.
राज्यातील 17 विद्यमान खासदारांसह 323 उमेदवारांचे भवितव्य या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात ठरणार आहे. राज्यभरातील 33 हजार 314 मतदान केंद्रांत 3 कोटी 12 लाख मतदार ‘ईव्हीएम’वर आपले मत नोंदवणार आहेत. यामध्ये एक कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर एक कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. यासाठी एक लाख 7 हजार 995 ईव्हीएम तर 43 हजार व्हीव्ही पॅट यंत्रे देण्यात आली आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, मावळसह 17 मतदारसंघांत मतदारांचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. यामुळे महायुतीच्या उमेदवारांमध्ये आणि मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
उष्माघाताने दोन कर्मचाऱयांचा ऑनडय़ुटी मृत्यू
निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी ‘ऑनडय़ुटी’ असलेल्या एका पोलिसासह निवडणूक कर्मचाऱयाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटना अनुक्रमे भिवंडी व उल्हासनगर येथे घडल्या. पालघर येथील वाडय़ाचे रहिवासी असलेल्या दशरथ कोरडे (57) यांचा तर उल्हासनगरच्या म्हारळ गाव येथील मीनल चौहान विद्यालयातील बुथवर डय़ुटीवर असलेल्या भगवान मगरे (54) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.
मतदानासाठी मतदार चिठ्ठीसोबत ओळखपत्र आवश्यक
मतदारांच्या सोयीसाठी देण्यात आलेली मतदार चिठ्ठी ही मतदाराचे नाव, मतदान केंद्र याच्या माहितीसाठी आहे. केवळ ही मतदार चिठ्ठी मतदानासाठी पुरेशी नाही. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र अथवा 12 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र आवश्यक असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.
- पासपोर्ट
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- वाहनचालक परवाना
- कर्मचारी ओळखपत्र
- बँकांचे पासबुक
- नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर
- मनरेगा जॉबकार्ड
- आरोग्य विमा स्मार्टकार्ड
- निवृत्तीवेतन दस्तावेज
- खासदार/आमदार यांनी दिलेले ओळखपत्र
- रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्सद्वारे दिलेले स्मार्टकार्ड
महायुतीचे शिलेदार
गजानन कीर्तिकर ,उत्तर पश्चिम मुंबई
अरविंद सावंत,दक्षिण मुंबई
राहुल शेवाळे.दक्षिण मध्य मुंबई
राजन विचारे,ठाणे
डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण
गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई
मनोज कोटक,उत्तर पूर्व
मुंबई,पूनम महाजन,उत्तर मध्य मुंबई
कपिल पाटील,भिवंडी
राजेंद्र गावीत,पालघर
लतादीदींनी केले मतदान करण्याचे आवाहन
देशाचे भविष्य तुमच्या हातात!
अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी सेलिब्रेटीदेखील आवाहन करताना दिसत आहेत. गानसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांनीही रविवारी ट्विट करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नमस्कार! उद्याचा दिवस विसरू नका. उद्या मतदान नक्की करा. देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे, अशा आशयाचे ट्विट लतादीदींनी केले आहे.
































































