मसुब’च्या सुरक्षारक्षकाला फलाटावर मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

तिकीटघराजवळ दुचाकी लावण्यास मज्जाव केला म्हणून संतापलेल्या चौघांनी मिळून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला बेदम मारहाण केल्याची घटना टिळक नगर रेल्वे स्थानकात घडली. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोघांना अटक केली.

शंकर आव्हाड (30) हे महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत असून त्यांची टिळक नगर रेल्वे स्थानकात डय़ुटी होती. रेल्वेमध्ये नोकरीला असलेला अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी (31) हा त्याची मोटारसायकल तिकीटघर येथे लावत असताना तेथे गाडी पार्प करण्यास आव्हाड यांनी मज्जाव केला. गाडी लावण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने अब्दुलने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून आव्हाड यांना शिवीगाळ करीत त्यांना फलाटावरच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच तुला बघून घेऊ अशी दमदाटी केली. याप्रकरणी आव्हाड यांच्या तक्रारीनुसार नेहरू नगर पोलिसांनी चौघाजणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी आणि व्यवसायाने वकील असलेल्या इरफान अब्दुल अजिज अन्सारी (28) याला अटक केली. त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.