मंत्रालयात बायोमेट्रिक हजेरी फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार, ओमायक्रोनचा धोका टळला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी ओमायक्रोनचा धोका कायम आहे. त्यामुळे मंत्रालयासह राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांतील बायोमेट्रिक हजेरी फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

राज्यासह मुंबईत ओमायक्रोनचा धोका वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने मंत्रालय तसेच नवीन प्रशासकीय इमारत आणि राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांतील बायोमेट्रिक हजेरीपद्धत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण अजूनही संसर्गाचा धोका टळलेला नसल्याने आता 28 फेब्रुवारीपर्यंत शासकीय कार्यालयांतील बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणेच ऑफिसमधील मस्टरवर हजेरी नोंदवावी लागणार आहे.

फेसमेट्रिक्स हजेरीची योजना

भविष्यातही कोरोनासारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांत फेसमेट्रिक्स हजेरी लावण्याच्या दृष्टीने राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने पावले उचलली आहे. म्हणजे हजेरीसाठी मशीनवर हाताचे बोट न ठेवता केवळ मशीनसमोर चेहरा दिसला की कर्मचारी व अधिकाऱयांची हजेरी लागणार आहे. सुरुवातीला ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे पण या योजनेला अंतिम स्वरूप मिळेपर्यंत बायोमेट्रिक किंवा मस्टरवर हजेरीची पद्धत सुरू राहील, असे माहिती व तंत्रज्ञान विभागातील सूत्रांनी सांगितले.