
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. महापौरांना फोनवरून धमकी देणार्या या व्यक्तीने नाव मात्र सांगितले नाही. याबाबत महापौर पेडणेकर यांच्याकडून आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी धमकीच्या फोनबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आज ही माहिती दिली. 21 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता महापौर किशोरी पेडणेकर यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने महापौरांशी अर्वाच्य आणि अश्लील भाषेत बोलताना जिवे मारण्याची धमकी दिली. फोनवर बोलणारा हिंदी भाषेत बोलत होता. आपण जामनगरमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. मात्र नाव सांगितले नाही. अर्वाच्य भाषा आणि धमकी दिल्यानंतर त्याने फोन कट केला. यानंतर महापौरांनी संबंधित नंबरवर 8 मिनिटांनी दोन वेळा कॉल केला. पण संपर्क झाला नाही. या फोननंतर महापौरांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर 261/2020 नोंदवला आहे.
‘फोनवर बोलणार्या अज्ञाताने जामनगरवरून बोलत असल्याचे सांगत घाणेरडे शब्द वापरत मोठमोठ्याने बोलण्यास सुरुवात केली. पोलिसांना सांगितले तर ठार मारीन अशी धमकी दिली. ही धमकी देणारा कुणीतरी परिचित असावा किंवा राजकीय वाईट हेतूने बोलत असावा. मात्र आपले पोलीस खाते सक्षम आहे. ते याची चौकशी करून सत्य समोर आणतील. आपण अशा धमक्यांना घाबरत नाही’, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
महापौरांना धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात!
महापौर किशोरी पेडणेकर यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी गुजरात जामनगरमधून ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांचे पथक उद्या त्याला मुंबईत घेऊन येणार आहे. तपास अधिकारी उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच नावं मनोज दोढीया असून तो 20 वर्षांचा आहे. हे कृत्य का केलं याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत.
































































