गोवरने दगावलेल्या बालकांच्या माता करणार लसीचा प्रचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गोवर आजाराचा संसर्ग वाढला असून लहान मुलांना याची झपाटय़ाने लागण होत आहे. गुरुवारी गोवर संशयित आठव्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने पालकांमध्ये भीती पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी गोवंडीच्या शिवाजी नगर येथे पालक आणि शिक्षकांचा गोवरचा प्रादुर्भाव रोखण्या संदर्भात एका छोटा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोवंडीत ज्या मतांची बालके गोवरमुळे दगावली आहेत, अशा मातांनी लसीकरणाचे महत्व सांगितले. तसेच त्यांनी आमच्या वाट्याला जे दुःख आले, ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये असे म्हटले.

शाहीन खान या महिलेचा 14 महिन्यांचा मुलगा फैजल हा गोवरच्या प्रादुर्भावाचा पहिला बळी ठरला होता. यावेळी त्या म्हणाल्या की, “लसीकरण तुमच्या मुलांचा जीव वाचवू शकते. तुमच्या मुलांचे लसीकरण करा. गोवंडीतील इतर कोणत्याही मुलाला असे मरण यावे अशी माझी इच्छा नाही”. शाहीन आणि तिची नातेवाईक सहरुनिसा खान यांनी मुलांचे लसीकरण न केल्यामुळे कुटुंबातील तीन मुलांना गोवरची बाधा झाली. विषाणूजन्य आजाराने आपली मुले गमावल्यानंतर सुमारे 25 दिवसांनंतर आता त्या लसीकरणाचा प्रचार करत आहेत.

पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या मातांना गोवरची लक्षणे कशी ओळखावी आणि लसीकरणाचे महत्त्व याविषयी माहिती देण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. यावेळी खान म्हणाल्या की “जर मी एका आईलाही तिच्या मुलाला लसीकरण करण्याचे महत्व पटवून दिले, तर माझ्या मुलाचा मृत्यू वाया गेला नाही, असे मला वाटेल ” आपल्या मुलाला लस न दिल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

ऑक्टोबरमध्ये शाहीन आणि सहरुनिसा यांच्या मुलांचे पाठोपाठ मृत्यू झाल्यामुळे गोवंडीमध्ये सप्टेंबरच्या अखेरीस गोवरचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले. मुंबईत गोवर संशयित रुग्णांची संख्या 2623 वर पोहोचली असून 169 जणांमध्ये गोवर आजाराचे निदान झाले आहे. यातील तब्बल 80% संशयित रुग्ण गोवंडीतील आहेत.

स्थानिक अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार विभागातील अनेक मातांनी लसीकरणाचा प्रचार सुरु केला आहे. या महिला परिसरातील मातांना लसीकरणाचे महत्व सांगत आहेत. तसेच त्यांच्या बाळांमध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करा असे आवाहन करत आहेत.

शाळांमध्ये गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी पालिकेने गोवंडीत पालक-शिक्षक बैठकांची मालिका सुरू केली आहे. पालिका आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी गुरुवारी 40 मौलवी आणि स्थानिक खासगी व्यावसायिकांशी संवाद साधला. यावेळी मौलवींना शुक्रवारी नमाजाच्या वेळी लसीकरण शिबिरांची घोषणा करण्याचे आवाहन केले.