मेट्रोमुळे अंधेरी स्थानकात वाढतायत प्रवाशांचे लोंढे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मेट्रो वनच्या प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची होणारी जीवघेणी कोंडी पाहून तातडीने उपाय योजा असे रेल्वेमंत्र्यांनी बजावल्यानंतर जाग्या झालेल्या पश्चिम रेल्वेने अंधेरी स्थानकाची प्रवाशांची संख्या मोजली असता ती तब्बल 13 लाख इतकी निघाली. हा एकप्रकारचा गर्दीचा विक्रमच मानला जात आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने अंधेरी स्थानकाचा पुढील दहा वर्षांचा विचार करून उपाय योजण्याची योजना आखली आहे.

घाटकोपर ते वर्सोवा असे धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनची दोन स्थानके रेल्वेच्या स्थानकांना जोडली जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या घाटकोपर आणि पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकात मेट्रोच्या प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे आदळत आहेत. पूर्वी दादरहून लोकल बदलणारे प्रवासी अंधेरीतून लोकल बदलत असल्याने अंधेरीत गर्दी करीत आहेत. त्यामुळे येथे एल्फिन्स्टन रोडसारखी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईतील एका कार्यक्रमात रेल्वेमंत्र्यांनी या दोन्ही स्थानकांत प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा वाढवा असे आदेश दिले होते. यानंतर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी अंधेरी स्थानकाची प्रवासी संख्या मोजण्याचे आदेश काढले.

…म्हणून केली शिरगणती

प्रवासी संख्या मोजताना किती प्रवासी स्थानकातून प्रत्यक्ष तिकीट काढतात त्यावरून संख्या मोजली जाते, मात्र रोजचे प्रवासी मोजताना प्रत्यक्षात जास्त प्रवासी स्थानकात गर्दीच्या वेळी असतात. कारण बरेचसे प्रवासी पासधारक असतात. त्यामुळे प्रत्यक्षात स्थानकातून दररोज ये-जा करणाऱयांची प्रवासी संख्या किती तरी अधिक पटीने असते. त्यामुळे प्रत्यक्ष अधिकारी नेमून पश्चिम रेल्वेने प्रवासी संख्या मोजली असून ती 13 लाखांच्या आसपास निघाली आहे.

अशी योजना राबविणार

फलाट क्र. 8 आणि 9 वर पहिल्या पर्यायानुसार सध्या 6 ते 7 मीटर रुंद असलेला फलाट आणखी रुंद करण्याचा विचार आहे. दुसऱया पर्यायानुसार नवीन फलाट क्र.10 बांधण्याचा प्रस्ताव असून दोन्ही दिशांना डिस्चार्ज होणारा फलाट मिळणे शक्य होणार आहे.

अशी मोजली संख्या

अंधेरी स्थानकात सोमवार ते बुधवार तीन दिवस सर्व प्रवेश व बाहेर पडण्याच्या 12 गेटवर प्रत्येकी चार अशा 48 अधिकाऱयांना नेमण्यात आले. तसेच पादचारी पुलांच्या पायऱयांवर फेस डिटेक्शन कॅमेरे वापरण्यात आले. 98 तिकीट तपासणीसांना तीन शिफ्टमध्ये तीन दिवस नेमण्यात येऊन प्रवाशांची संख्या मोजण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

गर्दीच्या वेळी आढळलेले प्रवासी

सकाळी 8 ते 11 दरम्यान अंधेरीच्या फलाट क्र.6 व 7 वर 2.61 लाख प्रवासी संख्या आढळली तर सायं. 5 ते 8 या वेळेत 1.11 लाख प्रवासी आढळले. फलाट क्र. 8 व 9 वर सर्वाधिक गर्दी होत असून येथे अंधेरी लोकल संपविण्यात येऊन तिला विरार लोकल म्हणून पुढे चालविले जाते. फलाट क्र. 7 व 8 वर सकाळी 8 ते 11 दरम्यान 26 हजार प्रवासी आढळले तर येथेच सायं. गर्दीच्या वेळी 5 ते 8 दरम्यान तब्बल 72 हजार प्रवासी मोजण्यात आले.

तिकीट विक्रीनुसारची प्रवासी संख्या

  • अंधेरी रेल्वे स्थानक – 7 लाख
  • अंधेरी मेट्रो स्थानक – 2 लाख
  • घाटकोपर रेल्वे स्थानक – 2.24 लाख