मेट्रोच्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा वरळी स्थानकात पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी ‘मेट्रो-3’ प्रकल्पाच्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा बुधवारी पूर्ण झाला. वरळी-सायन्स सेंटर ते दूरदर्शनपर्यंत 2.07 किलोमीटर भुयार करत टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) यशस्वीरीत्या पोहचली. पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे ब्रेक थ्रू पार पडले.

‘मेट्रो-3’ या प्रकल्पात एकूण सात पॅकेजेस आहेत. त्यातील पॅकेज-3 हे सर्वात लांब पॅकेज आहे. त्यात मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-3 मधील पहिला टप्पा आज पूर्ण झाला. ‘तानसा-1’ या टीबीएम मशीनने गेल्या 27 सप्टेंबर रोजी सायन्स म्युझियम येथून भुयारीकरणाला सुरुवात केली. अनेक आव्हाने पार करत या टीबीएमने 2073 मीटर भुयारीकरण पूर्ण केले. या भुयारीकरणासाठी 1381 सेगमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला.

आतापर्यंत उपनगरीय रेल्वेद्वारे न जोडली गेलेली मुंबईतील मुख्य व्यापारी केंद्रे पॅकेज-3 द्वारे जोडली जाणार असून या भागात नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी भुयारी मेट्रो ही नवसंजीवनीच ठरेल असा विश्वास यावेळी मुंबई मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी व्यक्त केला. ‘मेट्रो-3’च्या भुयारीकरणासाठी 17 टीबीएम मशीन्स कार्यरत आहेत. मुंबईच्या उदरात 60-70 मीटर खोल हे भुयारीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. 24 सप्टेंबर 2018 रोजी पहिले भुयार पूर्ण झाले होते.

‘मेट्रो-3 च्या कामाची प्रगती पाहून आनंद वाटला. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबई मेट्रो रेल महामंडळ याच उत्साहाने आणि गतीने प्रकल्पाचे काम सुरू ठेवेल अशी मला खात्री आहे’ असे याप्रसंगी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

पर्यावरणाची हानी न करता विकास करणे हेच सरकारचे धोरण

पर्यावरणाला धक्का न पोहोचवता, निसर्गाची हानी न करता विकास करायचा हेच ठाकरे सरकारचे धोरण असून आतापर्यंत सरकारने घेतलेले निर्णय हे याच धर्तीवरचे आहेत असे सांगतानाच आरे कारशेडबाबत समितीने दिलेल्या अहवालाचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आरेमधील मेट्रो कारशेडबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने चारसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. अहवाल मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचला असला तरी अद्याप तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिलेला नाही. तसेच पूर्ण अहवाल अजून आलेला नाही असे सांगतानाच या अहवालात समितीने काय शिफारशी केल्या आहेत त्याचा सखोल अभ्यास करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कारशेड इतरत्र हलवल्यास खर्च आणि अडथळे वाढून प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता समितीने या अहवालात वर्तवली असल्याची चर्चा आहे. त्या आधारावर विरोधी पक्षाने कारशेडच्या कामावरील स्थगिती हटवून काम पुन्हा सुरू करावे अशी मागणी केली आहे.