
सामना प्रतिनिधी। मुंबई
‘मेट्रो-3’च्या कामामुळे मुंबईत पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल महामंडळाने (एमएमआरसीएल) आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या 27 ठिकाणी एमएमआरसीएलने 338 पंप बसवले आहेत. साचलेल्या पाण्याचा हे पंप वेगाने निचरा करू शकणार आहेत. त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या मार्गावर 308 कर्मचारीही नेमले जाणार आहेत जे पावसाळी परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतील.
एमएमआरसीएल आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱयांचीं गेल्याच आठवडय़ात एक बैठक झाली. त्यामध्ये पावसाळ्यातील संभाव्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. मेट्रोच्या कामासाठी पावसाचे पाणी तसेच सांडपाणी वाहून नेणाऱया पाइपलाइन्स इतर मार्गाने वळवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थापन पथकही स्थापन करण्यात आले असल्याची माहिती एमएमआरसीएलच्या अधिकाऱयांनी दिली.
192 पंप दक्षिण मुंबईत
एमएमआरसीएलने पावसाचे पाणी उपसण्यासाठी बसवलेल्या 338 पंपांपैकी 192 पंप हे दक्षिण मुंबईत आहेत. 20 पंप छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आसपासच्या परिसरात बसवण्यात आले आहेत. मुंबईतील सहापैकी पाच मेट्रो लाइन्सचे काम करणाऱया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेही (एमएमआरडीए) पावसाळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी 75 इंजिनीयर्स आणि 150 कामगारांची फौज तयार केली आहे. तसेच विविध ठिकाणी 20 पंप बसवले आहेत. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मार्ग असलेल्या ‘मेट्रो-3’चे काम दक्षिण मुंबईपासून पश्चिम द्रुतगती मार्गावरील सीप्झपर्यंत सात ठिकाणी सुरू आहे. त्यासाठी जमिनीत 20 मीटरपेक्षाही खोल खड्डे खणले गेले आहेत. अनेक ठिकाणी खोदकाम केले गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होईल अशी भीती मुंबईकरांनी व्यक्त केली होती. गेल्या वर्षी जोरदार पावसामुळे या मेट्रोचे काम ठप्प झाले होते.



























































