
मुंबईच्या चौपाटय़ांवर सध्या जेलीफिशचा हल्ला झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत पालिका प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवाय गणेशमूर्ती विसर्जनस्थळी सुविधांबाबत कार्यवाही करण्याचे आदेशच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून वॉर्ड ऑफिसरना देण्यात आले आहेत.
मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात पालिकेच्या वतीने मत्स्य व्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार, मत्स्य व्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा दिला आहे.
असा करा बचाव…
n गणेश विसर्जन पालिकेच्या वतीने नेमणूक करण्यात आलेल्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे.
n गणेशभक्तांनी उघडय़ा अंगाने समुद्रात प्रवेश करू नये. पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.
n गणेश भक्तांना उपरोक्त सूचनांचे पालन करण्यासाठी चौपाटय़ांवर उपलब्ध असलेल्या नागरी गणेशोत्सव प्रणालीचा वापर करण्यात यावा.
n गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणच्या वैद्यकीय कक्षांमध्ये मत्स्यदंशाच्या अनुषांगिक आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवावा.
n चौपाटय़ांवर लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील सूचना आणि घोषणा पाळाव्यात. लहान मुलांना पाण्यामध्ये जाऊ न देण्याची खबरदारी घ्यावी.
मत्स्यदंश आणि प्रथमोपचार
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रुग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.





























































