
सामना प्रतिनिधी। मुंबई
असह्य होणाऱया दाढदुखी, किडलेले दात हे तपासण्यासाठी एखादा खासगी दवाखाना किंवा थेट नायर किंवा सेंट जॉर्ज रुग्णालयाशेजारील शासकीय दंत रुग्णालय गाठण्याशिवाय पर्याय नसतो. यावर तोडगा म्हणून दातांच्या विकारांवर उपचार करण्यासाठी थेट नायर दंत विद्यालयाचे डॉक्टरच रुग्णांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी नायर दंत रुग्णालयाची सुसज्ज व्हॅन तयार करण्यात आली असून वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन दातांचे आरोग्य तपासले जाणार आहे.
नायर दंत रुग्णालयाकडून एक सुसज्ज व्हॅन तयार करण्यात आली असल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. नीलम अंद्रेड यांनी सांगितले.
संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या व्हॅनमध्ये डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या आवश्यक सर्व व्यवस्था पुरविण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर दातांचे एक्सरे काढण्यासाठी एक्सरे मशीनही या व्हॅनमध्ये फिट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दातांचे आरोग्य राखण्यासाठी कशी काळजी घेता येईल, त्याचप्रमाणे मुखाच्या कर्करोगापासून कसे दूर राहता येईल यासाठी जनजागृती करण्यासाठी या व्हॅनमध्ये एलईडीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका दवाखाने, धारावी, गोवंडी, चिता कॅम्प अशा वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या दातांच्या तक्रारीवर उपचार केले जाणार असल्याचे डॉ. नीलम यांनी सांगितले. या व्हॅनचे लवकरच लोकार्पण होणार असून त्यानंतर ती रुग्णांच्या सेवेसाठी रवाना होणार आहे.
दातदुखीवर 24 तास उपचार
नायर दंत रुग्णालयाने दातांच्या विकारांवर 24 तास उपचार उपलब्ध केले आहेत. रात्री अचानक उद्वणारी दाढदुखी रुग्णांना असह्य होणारी असते. अशा परिस्थितीत डॉक्टरही उपलब्ध नसल्याने ती सहन करण्यापलीकडे पर्याय नसतो. अशा रुग्णांसाठी नायर रुग्णालयात 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस सुरू ठेवली जाणार आहे. पूर्वी सायंकाळनंतर रुग्णालयात दातांच्या विकारांवर उपचार होत नसत, मात्र आता नायर दंत रुग्णालयात 24 तास हे उपचार उपलब्ध असणार आहेत, असे डॉ. नीलम अंद्रेड यांनी सांगितले.



























































