
मुंबईजवळील मढ कोळीवाडा परिसरातून मासेमारीसाठी गेलेल्या एका नौकेला खोल समुद्रात चिनी मालवाहू जहाजाने धडक दिली. रविवारी पहाटे झालेल्या दुर्घटनेत नौकेचे मोठे नुकसान झाले असून नौका बुडाली. सुदैवाने या दुर्घटनेतील खलाशासह सहा जणांना आजूबाजूच्या बोटींनी वाचवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मालवाहू जहाजाचा चालक होता नशेत
धडक देणाऱया चिनी मालवाहू जहाजातील चालक हा नशेत असल्याचा आरोप अपघातग्रस्त तिसाई नौकेतील खलाशांनी केला आहे. अपघातात तिसाई नौकेचे मोठे नुकसान झाले असून चालकावर कारवाई करावी आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तिसाई नौकेचे मालक हेमदीप टिपरी यांनी केली आहे.
मढ येथून तिसाई नौका खोल समुद्रात गेली होती. मासेमारी करत असताना रविवारी पहाटे या नौकेला चिनी मालवाहू जहाजाने धडक दिली. त्यामुळे नौका बुडाली. तेव्हा नौकेवरील सर्वांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली.
सवटी ग्रुपने वाचवले खलाशांचे प्राण
अपघात झाला त्या वेळी जवळच असलेल्या सवटी ग्रुपच्या आठ नौकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तत्काळ अपघाताच्या ठिकाणी धाव घेत नौकेवरील तांडेल आणि इतर पाच जणांचे प्राण वाचवले. सवटी ग्रुपच्या बोटींनी अपघातग्रस्त मासेमारी नौकेला बांधून खोल समुद्रातून मढ बंदरात आणले.































































