
घाटकोपर परिसरात एका बांधकाम साईटवर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यात चौघेजण जखमी झाले. मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये स्फोट झाल्याने कामगार वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटात जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अधिक उपचार सुरु आहेत. दोघेजण 60 ते 70 टक्के भाजल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घाटकोपरच्या नीलधारा इमारतीच्या परिसरात ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. स्फोटामुळे कामगारांच्या तात्पुरत्या शेडला आग लागली होती. त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश मिळवले. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात घटना घडल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. घनश्याम यादव (36) आणि देवेंद्र पाल (26) हे दोघे कामगार गंभीररित्या भाजले आहेत, तर महेंद्र चौधरी (32) आणि संदीप पाल (20) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ते अनुक्रमे 12 टक्के आणि 5 टक्के भाजले आहेत. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
मागील आठवडाभरात मुंबई शहरात गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या बुधवारी कांदिवली परिसरात एका एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यात सात जण जखमी झाले होते. जखमींमध्ये महिलांचा समावेश होता. उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच घाटकोपर परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.