Mumbai News – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन, अनेक विमानांची उड्डाणे उशिराने

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाले आहे. यामुळे विमानतळावर चेक इन आणि बोर्डिंग प्रोसेस मॅन्युअल पद्धतीने होत आहे. यामुळे अनेक विमानांची उड्डाणेही उशिराने सुरू आहेत. इंडिगो, एअर इंडिया, अकासा, विस्तारा या विमान कंपन्यांना याचा फटका बसला आहे. सर्व्हर डाऊनमुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मुंबई विमानतळावरील सर्व्हर डाउनमुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.

सर्व्हरच्या समस्येचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. सर्व सिस्टीम सुरळीत सुरू असताना अचानक सर्व्हर क्रॅश झाल्याचे बोलले जात आहे. नेटवर्कमधील बिघाडामुळे बोर्डिंग पास प्रिंट करण्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या विमानतळ प्राधिकरण समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी हे काम मॅन्युअली केले जात आहे. गर्दी लक्षात घेता, आपत्कालीन सेवा देखील सक्रिय करण्यात आल्या आहेत.

चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया मॅन्युअल मोडवर केल्यामुळे प्रवाशांचे सामान तपासण्यास वेळ लागत आहे. विमानतळ प्रशासन ही तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. विमानतळाच्या आयटी आणि कोअर टीमकडून नेटवर्क दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्व विभागांना एसओपीनुसार ‘आपत्कालीन’ प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.