Mumbai News – बस, टॅक्सी, स्कूल बस, रिक्षाचा बेमुदत संप; विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई-चलन प्रणालीद्वारे दंडवसुलीविरुद्ध राज्यातील वाहतूकदारांनी गुरुवार 5 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये ठोस लेखी आश्वासन न मिळाल्याने वाहतूक संघटनांनी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूल बस मालकही या संपात सहभागी होणार असल्याने ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

ई-चलन प्रणालीद्वारे वाहनधारकांची नियमबाह्य पद्धतीने लूट सुरु आहे. ई-चलन प्रणालीतील त्रुटी दूर करणे, एकाच गुन्ह्यासाठी वारंवार दंड आकारणे बंद करणे आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था नसताना होणारी दंडात्मक कारवाई थांबवणे या प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतला आहे.

ट्रक, टेम्पो, स्कूल बस, खाजगी टुरिस्ट बस, टॅक्सी आणि रिक्षा या संपात सहभागी होणार आहेत. राज्यातील हजारो वाहतूकदार मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत ठोस सरकारी निर्णय (GR) निर्गमित होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा वाहतूकदारांनी घेतला आहे.

बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच मुंबई स्कूल बस असोसिएशनने संपाला पाठिंबा दिल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध नसल्यास ॲप-आधारित कॅबच्या दरात मोठी वाढ होऊ शकते.