Mumbai News – जुना वाद टोकाला गेला, दोन कुटुंबांचा एकमेकांवर कोयत्याने हल्ला; तिघांचा मृत्यू

जुन्या वादातून दोन कुटुंबांनी एकमेकांवर चाकू आणि कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दहिसरमधील गणपत पाटील नगरमध्ये राहणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबामध्ये 2022 पासून वाद होते. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबात वैमनस्य होते. रविवारी राम गुप्ता याच्या नारळ विक्री स्टॉलसमोर शेख दारु पिऊन आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यानंतर दोघांनी आपापल्या मुलांना बोलावले.

दोन्ही कुटुंबाने एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केले. यात राम गुप्ता, अरविंद गुप्ता आणि हमीद शेख यांचा मृत्यू झाला. तर अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख आणि हसन शेख हे जखमी झाले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोन्ही गटावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अद्याप अटक करण्यात आली नाही.