Mumbai News – चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चौघांना अटक

बांधकामाधीन इमारतीत चोरी केल्याच्या संशयावरून कामगारांनी 26 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना गोरेगावमध्ये उघडकीस आली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीडित तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील तीन डोंगरी येथील सुभाष नगर येथे ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल परमा (26) असे मयत तरुणाचे नाव आहे. हर्षलची आई सुवर्णा रामसिंग परमा (61) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हर्षल 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दारू पिण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता, परंतु त्या रात्री तो परतला नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास, गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी सुवर्णाच्या घरी पोहोचले. हर्षलवर राज पॅथ्रोन इमारतीत काही लोकांनी हल्ला केला आहे आणि त्याला बेशुद्ध अवस्थेत ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे पोलिसांनी घरच्यांना सांगितले. यानंतर ही घटना उघडकीस आली.

सुवर्णा परमा यांच्या तक्रारीच्या आधारे, गोरेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली चारही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांनाही अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.