पार्किंगची समस्या सुटणार, पालिकेच्या पार्किंग प्राधिकरणाला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळातही अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचा पालिकेचा सपाटा सुरूच असून पार्किंगची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीने पार्किंग प्राधिकरणाला मंजुरी दिली आहे, तसेच निवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा यांची मार्गदर्शक तर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची बाह्य सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती केली आहे.

‘मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा विकास आराखडा-2034’आणि संबंधित ‘विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-2034’नुसार महानगरपालिकेच्या सर्व रस्त्यांवरील व रस्त्यालगतच्या वाहनतळांचे व्यवस्थापन, नियोजन आणि नियंत्रण करण्याकरिता वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार वाहनतळ प्राधिकरण निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यास व त्यासाठी बाह्य सेवा पुरवठादार यांची व तज्ञ मंडळींची नेमणूक करण्यास स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ यांची बाह्य सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत संबंधित विषयातील तज्ञ मंडळींच्या सेवा उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती नवनियुक्त वाहनतळ आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

मोबाईल अॅप, नियोजनासाठी पार्किंग मार्शल

मुंबईत पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी प्राधिकरणातर्फे वाहन व्यवस्थापनासाठी मोबाईल अॅप सुरू केले जाणार आहे. त्यामुळे कुठूनही चालकाला आवश्यक असलेल्या परिसरात पार्किंग बुक करता येणार आहे. त्याचबरोबर वाहनांच्या नियोजन आणि नियंत्रणासाठी, कोणतीही पार्किंग समस्या निर्माण होऊ नये यासाठी पार्किंग मार्शलची नियुक्ती पालिकेकडून केली जाणार आहे.

24 विभागांमध्ये वाहनतळांची निर्मिती

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये वाहनतळांची निर्मिती आणि व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार केला जाणार आहे. वाहनतळ दर, वाहतूक चिन्हे व फलक यासंबंधी निश्चित धोरण ठरवले जाणार आहे. शहरातील सरकारी, व्यावसायिक व निवासी इमारतींमधील वाहनतळ जागांचा सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने सिटी पार्किंग पूल तयार केला जाणार आहे.