मजबूत, खड्डेमुक्त, वर्षानुवर्षे टिकाऊ; मुंबईत आता प्लॅस्टिकवाले रस्ते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  •  देवेंद्र भगत

पालिका मुंबईत या वर्षीपासून मजबूत, खड्डेमुक्त आणि वर्षानुवर्षे टिकणारे प्लॅस्टिकयुक्त रस्ते तयार करणार आहे. यामुळे प्लॅस्टिक कचऱयाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून कारवाईत जप्त केलेल्या प्लॅस्टिकचाही सदुपयोग होणार आहे. या वर्षी पालिका 24 प्रभागांत 30 टेंडरच्या माध्यमातून 1400 कोटींचे 157 किमी लांबीचे नवे रस्ते तयार करणार आहे. यामध्ये 145 रस्ते सिमेंट-काँक्रीटचे तर 12 डांबरी रस्ते बनवले जाणार आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली.

मुंबईत पालिकेसह विविध प्राधिकरणांचे रस्ते असले तरी सर्वात जास्त म्हणजे सुमारे तब्बल 2 हजार किमीचे रस्ते पालिकेच्या मालकीचे असून त्यांची दुरुस्ती-देखभाल पालिकेच्या माध्यमातून केली जाते. मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये नव्या धोरणानुसार  नव्याने बांधण्यात येणारे 6 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते सिमेंट-काँक्रीटचेच तयार करण्यात येणार आहेत. पेव्हर ब्लॉकच्या जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, मात्र नव्याने पेव्हर ब्लॉकने रस्ते बनवण्यात येणार नाहीत. तर डांबरी रस्त्यांच्या वरच्या थरामध्ये 30 मिमी थराच्या मटेरियलमध्ये 5 टक्के प्लॅस्टिकचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पंत्राटदारांनी तयारीही दर्शवली आहे. त्यामुळे त्यांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

पावसाळ्याआधी खड्डे बुजवणार

पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात येतो. कोल्डमिक्स पाऊस सुरू असतानाही खड्डे भरण्यास प्रभावी ठरत असले तरी मुंबईत प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाहतूक असल्यामुळे कोल्डमिक्स पक्के बसण्यास अवधी मिळत नसल्यामुळे प्रभावी दिसत नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पावसाळ्यात मुंबईकरांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी या वर्षी पावसाळ्याआधीच खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी दुप्पट म्हणजेच 100 कोटींची तरतूद करून काम करण्यात येईल. एप्रिल-मेमध्येच जास्तीत जास्त काम करण्यात येईल.

पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त