COSTA Saving अ‍ॅप वापरताय? मुंबई पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले ‘हे’ आवाहन

 

प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले COSTA App Saving या अॅप्लिकेशनबाबत मुंबई पोलिसांनी गुंतवणूकदारांना एक आवाहन केले आहे. हे अॅप रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी किंवा इतर कोणत्याही नियामक संस्थेकडे नोंदणीकृत किंवा अधिकृत नसल्याचे सांगत अशा अनधिकृत किंवा नोंदणीकृत नसलेल्या ॲप्समध्ये अथवा प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करू नये असे आवहन करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे COSTA App Saving या अॅप्लिकेशन विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. गुंतवणूकदारांना अवास्तव आणि अधिक प्रमाणात परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे आढळले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत पोलिसांनी ट्विट करत गुंतवणूकदारांना सतर्क केले आहे.

”मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे (EOW) “COSTA App Saving” या नोंदणीकृत नसलेल्या ॲप विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये गुंतवणूकदारांना अवास्तव आणि अधिक प्रमाणात परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे आढळले आहे. गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असलेले COSTA App Saving हे ॲप आरबीआय, सेबी किंवा इतर कोणत्याही नियामक संस्थेकडे नोंदणीकृत किंवा अधिकृत नाही याची नोंद घ्यावी. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा नोंदणीकृत नसलेल्या ॲप्समध्ये अथवा प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित ॲप किंवा संस्थेची माहिती आरबीआय, सेबी किंवा इतर नियामक प्राधिकरणांकडून खात्री करून घ्यावी. जर तुम्ही अशा प्रकारच्या ॲपमध्ये गुंतवणूक केली असेल तर कृपया EOW मुंबई किंवा [email protected] या ईमेलवर तक्रार नोंदवा आणि सदरबाबत सविस्तर माहिती पाठवा. तुमची सतर्कता तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य ती पडताळणी करा”, असे मुंबई पोलिसांनी ट्विट केले आहे.