घरातून निघून गेलेल्या मुलींची निर्भया पथकांनी केली घरवापसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

अभ्यासाच्या नावाखाली इन्स्टाग्रामवर असते म्हणून आई ओरडत असल्याने घरातून निघून गेलेल्या तसेच गायिका होण्यास घरचे परवानगी देत नाही म्हणून मुंबईला पळून आलेल्या मुलींची टिळक नगर व ट्रॉम्बे पोलिसांच्या निर्भया पथकांनी सुखरूप घरवापसी केली.

गायिका बनायचे आहे, पण घरच्यांकडून त्यासाठी नकार होत असल्याने मध्य प्रदेशातील भोपाळ येथे राहणारी मुलगी पंजाब मेलने मुंबईत पळून आली होती. ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एकटीच बसलेली होती. टर्मिनस येथे एक अल्पवयीन मुलगी बसलेली असल्याची माहिती मिळताच टिळक नगर पोलिसांचे निर्भया पथक घटनास्थळी रवाना झाले व त्या मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने सर्व हकिकत सांगितली. त्यानुसार टिळक नगर पोलिसांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना मुलगी आमच्या ताब्यात असल्याचे कळवले. त्यानंतर तिच्या पालकांनी मध्य प्रदेश पोलिसांसह मुंबईत येऊन मुलीला आपल्या ताब्यात घेतले.

दरम्यान, अभ्यासाच्या ऐवजी इन्स्टाग्रामवर असते म्हणून आई ओरडल्याच्या रागातून एक मुलगी घरातून निघून गेली होती. बराचवेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. प्रार्थनेसाठी जाते असे सांगून मुलगी गेली होती. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने तत्काळ तपास सुरू केला असता ती मुलगी मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात सापडली. तिला ताब्यात घेऊन तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले