नायजेरियन ड्रग्जमाफियांना पकडण्यासाठी पोलिसांची ‘शॉक ट्रीटमेंट’, ताकदीऐवजी युक्तीचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मजबूत शरीरयष्टीच्या नायजेरियन ड्रग्जमाफियांना पकडण्यासाठी पोलिसांची शॉक ट्रीटमेंट यशस्वी ठरू लागली आहे.  हट्टेकट्टे असणारे हे माफिया पोलीस पकडण्यासाठी आल्यानंतर आपल्या बळाचा वापर करून पोलिसांवर हल्ला चढवतात आणि परागंदा होतात. त्यामुळे त्यांना जागेवरच पकडण्यासाठी पोलीस ताकदीऐवजी युक्तीचा वापर करू लागले आहेत. स्टनगनचा शॉक देऊन पोलीस त्यांना पकडत आहेत.

मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई, नालासोपारा आदी ठिकाणी नायजेरियन ड्रग्जमाफियांनी आपले बस्तान बसवले आहे. मजबूत शरीरयष्टीचे हे नायजेरियन माफिया मुंबईत येऊन स्थानिक पेडलर्सकरवी कोकेन, एमडी, हेरॉईन या ड्रग्जची छुप्या पद्धतीने विक्री करतात. बऱयाचदा हे नायजेरियन ड्रग्जमाफिया पोलिसांवर भारी पडतात. त्यांनी यापूर्वी पोलिसांवर दगडफेक केली असून मारहाणदेखील केली आहे. आपल्या ताकदीच्या जोरावर पोलिसांना धक्काबुक्की करून ते पळून जातात. त्यामुळे पोलिसांनी यावर तोडगा काढला आहे. अशा मजबूत शरीरयष्टीच्या नायजेरियन माफियांना पकडण्यासाठी पोलीस स्टनगनचा वापर करीत आहेत. स्टनगनने त्यांना शॉक दिला जातो. शॉक बसल्यामुळे काही क्षणासाठी ते हडबडून जातात. त्यांना काही सुचत नाही. याचाच फायदा घेत पोलीस त्यांच्यावर झडप घालतात. अशा प्रकारे अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी अनेक नायजेरियन ड्रग्जमाफियांना पकडल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांच्या भीतीने नवनवीन अड्डे

नवी मुंबई आणि नालासोपारा येथे राहणारे व मुंबईत ड्रग्जची डिलिव्हरी द्यायला येणाऱया नायजेरियन ड्रग्जमाफियांनी पोलिसांच्या कारवायांचा धसका घेतला आहे. म्हणूनच ते वेगवेगळ्या ठिकाणी आपले अड्डे बनवत असतात. आधी वाडीबंदर, रे रोड, भायखळा  येथे ड्रग्जचा धंदा करणाऱया नायजेरियन माफियांनी आता मानखुर्द येथे नवा अड्डा बनवला आहे. मानखुर्दला येऊन पुन्हा नवी मुंबईला पळून जाणे सोयीचे ठरत असल्याने मानखुर्द रेल्वे परिसरात त्यांनी आपली हालचाल वाढवली आहे. रेल्वे ट्रकबरोबर जवळच तिवरांची झाडे असल्याने तेथे त्यांना लपणेदेखील सोयीचे ठरत आहे.