
पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये जागतिक दर्जाचे वसतिगृह उभारले जाणार आहे. या नव्या वसतिगृहामधील एक हजार ते दीड हजार खोल्यांचा समावेश असेल. त्यासाठी आयआयटी मुंबईने माजी विद्यार्थ्यांच्या संघटनांबरोबर आज सामंजस्य करार केला. आयआयटी बॉम्बे अलूम्नी असोसिएशन (आयआयटीबीए) आणि आयआयटी बॉम्बे हेरिटेड फाऊंडेशन (आयआयटीबीएचएफ) या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या संस्थांबरोबर हा करार झाला आहे.
या सामंजस्य करारावर आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी, संबंधित संस्थांचे पदाधिकारी यांनी स्वाक्षऱया केल्या. आयआयटीच्या आवारात असलेल्या एच 8 या वसतिगृहाच्या जागी हे नवे वसतिगृह उभारले जाणार आहे. पवई तलावाला लागूनच हे वसतिगृह असणार आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा पुरवण्याबरोबरच शिक्षणासाठी उत्तम असे वातावरण निर्माण करणे याची पुरेपूर काळजी हे वसतिगृह उभारताना घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी माजी विद्यार्थ्यांच्या संघटनांनी 120 ते 350 कोटी रुपये उभारले आहेत.

























































