प्रबोधन मासिकाच्या शताब्दीनिमित्त प्रबोधनकारांच्या साहित्याचे प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील अग्रणी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘प्रबोधन’ नियतकालिकाचे शताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्ताने प्रबोधनकार ठाकरे यांचा अनमोल साहित्य ठेवा दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये संस्थेच्या संग्रही असलेले ‘प्रबोधन’ नियतकालिकाचे दुर्मिळ अंक तसेच प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली गंथसंपदा तसेच त्यांच्यावरचे लेखन आणि पुस्तके यांचा समावेश आहे.

‘प्रबोधन’चा पहिला अंक 16 ऑक्टोबर 1921 साली प्रकाशित झाला. यंदा प्रबोधन नियतकालिकाचे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने 28 डिसेंबरपासून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ग्रंथसंग्रहालयाच्या संग्रहात असलेले प्रबोधन नियतकालिकाचे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वर्षातील अंक दर्शनी भागात मांडले आहेत. तसेच प्रबोधनकारांनी लिहिलेली 23 पुस्तके-ग्रंथदेखील प्रदर्शनात आहेत. यामध्ये वक्तृत्वशास्त्र, हिंदू धर्माचे दिव्य, ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंड, भिक्षुकशाहीचे बंड, स्वाध्याय संदेश, पावन खिंडीचा पोवाडा, पंडिता रमाबाई सरस्वती, रायगड (यात्रा दर्शन माहिती), श्रीसंत गाडगेबाबा, प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी, वक्तृत्व कला आणि साधना, माझी जीवनगाथा आदी पुस्तकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्पृती मंडळाने प्रकाशित केलेले प्रबोधनकार ठाकरे समग्र वाड्मय खंडदेखील आहेत.

पुस्तकांना 100 वर्षे पूर्ण

प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या वक्तृत्व शास्त्र , ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंड, हिंदू धर्माचे दिव्य या पुस्तकांना 100 वर्षे झाली आहेत. अनुक्रमे 1918, 1919, 1919 साली त्यांचे प्रकाशन झाले होते. तर भिक्षुकशाहीचे बंड हे पुस्तक 1921 साली प्रकाशित झाले होते.