
मुंबई शहरातील 19 महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशील जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल अॅपवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-प्रॉपर्टी कार्ड हे अॅप नागरिकांसाठी विकसित केले असून या अॅपचे लोकार्पण मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले.
ई-प्रॉपटी कार्ड अॅपची सुविधा मुंबई शहर जिह्यासाठी असून पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी अॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना किंवा जमीनधारकांना जमिनीचा नकाशा, सिटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल. हे अॅप सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी निवतकर यांनी सांगितले.
- या अॅपची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या mumbaicity.gov.in Je prcmumbai.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इज ऑफ डुइंग बिझनेस उपक्रमांतर्गत मुंबई शहर एनआयसीने ‘ई-प्रॉपर्टी कार्ड’ या अॅपची निर्मिती केली आहे. जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कविता पाटील आणि अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी अनिल राठोड यांनी हे अॅप विकसित केले आहे.



























































