नर्सरी, ज्युनियर केजीच्या जागांमध्ये वाढ, मुंबई पब्लिक स्कूलला भरघोस प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या मुंबई पब्लिक स्कूल या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना विद्यार्थी, पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना सोयीसुविधांनी युक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून नर्सरी आणि ज्युनियर केजीच्या जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला आहे. पालिकेच्या 11 सीबीएसई आणि 1 आयसीएसई शाळा मिळून नर्सरी आणि ज्युनियर केजीच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत.

मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मिळणाऱया शिक्षणाचा दर्जा पाहता अधिकाधिक पालक आपल्या पाल्याला या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मुंबई पब्लिक स्कूलच्या सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा ज्या भागात आहेत तेथे अन्य नामवंत खासगी शाळा असूनही मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. मुंबई महापालिकाअंतर्गत मिळणाऱया शिक्षणावर पालकांचा वाढता विश्वास लक्षात घेता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी नर्सरी व ज्युनियर केजीची प्रत्येकी एक तुकडी वाढवण्यात यावी, अशी मागणी पालिका शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी मान्य केली आहे.

असा आहे प्रतिसाद

  • वर्ष 2020-21 मध्ये पूनम नगर सीबीएसई व वूलन मिल आयसीएसई या दोन शाळांतील एकूण 640 जागांसाठी तब्बल 1 हजार 852 अर्ज आले.
  • वर्ष 2021-22 मध्ये 11 सीबीएसई व 1 आयसीएसई अशा 12 शाळांतील एकूण 3 हजार 849 जागांसाठी 9 हजार 635 अर्ज आले.
  • वर्ष 2022-23 साठी नर्सरी तसेच ज्युनियर केजी ते आठवीपर्यंतच्या उपलब्ध जागांच्या प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पडली. यात 722 उपलब्ध जागांसाठी 3 हजार 351 इतके ऑनलाइन अर्ज आले.