बेशिस्तीचा महामार्ग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 3 महिन्यांत नियम धाब्यावर बसवणाऱ्या 22 हजार वाहनांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता बेशिस्तीचा एक्सप्रेस वे ठरू लागला आहे. या एक्प्रेस वेवर वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत असून अवजड वाहनचालकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर या बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी परिवहन विभागाने सुरक्षा मोहीम सुरू केली असून गेल्या तीन महिन्यांत तब्बल 22 हजार 745 वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये बेफाम वेगाने धावणाऱ्या 5 हजार 18 तर लेन कटिंग करणाऱ्या 3 हजार 911 गाडय़ांना दंडाचा दणका दिला आहे.

वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहने कमाल 80 किलोमीटर वेगाने चालवणे बंधनकारक आहे. तसेच अवजड वाहने डाव्या मार्गिकेने चालवणे आवश्यक आहे. तरीही अनेक वाहनधारक नियम धाब्यावर बसवून गाडय़ा चालवतात. त्यांच्यावर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात 22 हजारहून अधिक वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये सीटबेल्ट न लावणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, गाडीची योग्य कागदपत्र नसणे आदींचा समावेश आहे.

जानेवारीत वाहनचालकांना वेगाची नशा

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात वाहनधारकांना वेगाची नशा चढल्याचे दिसत आहे. डिसेंबर महिन्यात वेगमर्यादा ओलांडणाऱ्या 914 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात बेफाम वेगाने गाडय़ा चालवणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून 2508 जणांनी वेगमर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे, तर फेब्रुवारी महिन्यात 1596 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

अपघाताचे प्रमाण घटले

वाहन चालवताना नियम मोडणाऱ्यांची मोठी संख्या असली तरी अपघाताचे प्रमाण मात्र घटले आहे. मागील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत 81 अपघात झाले होते. त्यामध्ये 21 प्राणांतिक अपघात होते. तर यंदा याच दोन महिन्यांत केवळ 43 अपघात झाले असून प्राणांतिक अपघाताची संख्या 14 एवढी आहे.