बांधकामाची तक्रार करण्याची धमकी देऊन मागितली खंडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनधिकृत बांधकामाची तक्रार करण्याची धमकी देऊन कंत्राटदाराकडे खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरोधात वाकोला पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकाला अटक केली. ऑल्विन सिरील नरोन्हाला असे त्याचे नाव असून त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. तक्रारदार हे सांताक्रुझ परिसरात राहत असून ते सिव्हिल कंत्राटदार आहेत. काही दिवसांपूर्वी ऑल्विनसह दोन जण त्याच्याकडे आले. त्या तिघांनी पत्रकार असल्याचे सांगून ते करत असलेले बांधकाम अनधिकृत असून त्याविरोधात पालिका आणि पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या तिघांनी खंडणीच्या रकमेची मागणी केली. घडल्याप्रकरणी तक्रारदारांनी वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. वाकोला पोलिसांनी तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुनयना नटे यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. खंडणीचा पहिला हप्ता घेण्यासाठी आलेल्या ऑल्विनला वाकोला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.