पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेतील वाढती कर्ज थकबाकी (एनपीए) देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकेल, असा गंभीर इशारा रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम. के. जैन यांनी देशातील बँकांना दिला आहे.
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना मदत देण्यासाठी मुद्रा लोन योजना सुरू केली होती. या स्वस्त व्याजदराच्या कर्जाची बँकांतील वाढती थकबाकी हा चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट करीत आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर जैन म्हणाले, सरकारने देशातील छोटय़ा उद्योगांना ऊर्जितावस्था यावी आणि युवा उद्योजकांना गरिबीतून वर काढण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली होती. पण गेल्या काही वर्षभरातील मुद्रा लोनची वाढती थकबाकी (एनपीए) ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता बँकांनी मुद्रा कर्जातील एनपीए कमी कसा होईल यासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी आणि या योजनेतून नवी कर्जे देताना लघु आणि मध्यम उद्योजकांची कर्ज परतफेड करण्याची क्षमताही तपासावी अशा सूचना जैन यांनी बँकांना दिल्या.































































