‘जेएनयू’मध्ये लवकरच सुरू होणार स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देऊन देशद्रोहाचे विष जिथे ओकले गेले त्या नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) परिसर नुकताच ‘भारतमाता की जय’, ‘ वंदे मातरम’च्या जयघोषाने दुमदुमला. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जेएनयूमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सावरकर यांच्या जीवनावर आधारीत ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग जेएनयूमध्ये सादर करण्यात आला. त्या वेळी वातावरण राष्ट्रभक्तीने फुलून गेले होते. लवकरच जेएनयूमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रही सुरू केले जाणार आहे.

जेएनयूमध्ये तेथील विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आता अभाविपच्या मदतीने तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने अनुमोदन दिले आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन तिथे हे केंद्र सुरू होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सावरकर यांच्याविषयीची माहिती, त्यांचे साहित्य यांचे अध्ययन करता येणार आहे. तसेच अभ्यासक्रमासाठी त्याचा उपयोग होणार आहे. पीएचडी, एम. फिल करणाऱयांनादेखील संदर्भ तसेच अन्य उपयुक्त माहिती या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. देशविरोधात चर्चा करणाऱया विद्यार्थ्यांमध्ये देशहितकारक विचार बिंबवण्यासाठीदेखील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र विशेष उपयुक्त राहील, असे मत या केंद्राला अनुमोदन देणारे स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी व्यक्त केले आहे.