दुसरी एसी लोकल मुंबईच्या वाटेवर,नव्या ट्रेनमध्ये 350 जादा प्रवासी सामावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबईकरांना थंडा थंडा कुल करण्यासाठी दुसरी एसी लोकल चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातून निघाली असून तिच्या चाचण्या झाल्यानंतर ती मार्च अखेरीस किंवा एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. या गाडीची मोटर आणि इतर यंत्रणा गाडीच्या खाली तळाला बसविण्यात आल्याने प्रवाशांना बसायला दहा टक्के जादा जागा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेवर देशातील पहिली वातानुकूलित लोकल आता चांगलीच स्थिरावली आहे. या वातानुकूलित लोकलच्या विरार ते चर्चगेट अशा एकूण बारा फेऱया होत आहेत. या लोकलला गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2018 रोजी एक वर्षे पूर्ण झाले. पहिल्या एसी लोकलची बांधणी चेन्नईच्या आयसीएफमध्ये झाली असली असून विद्युत यंत्रणा ‘भारतहेव्ही इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (भेल) कंपनीने तयार केली आहे.

नवी एसी लोकल ‘मेधा’ कंपनीची…

मुंबईकरांना मिळणाऱया दुसऱया एसी लोकलची बांधणी चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात झाली आहे. मात्र तिची विद्युत यंत्रणा हैदराबादच्या ‘मेधा सर्व्हो ड्राईव्ह’ कंपनीने केली आहे. या कंपनीच्या एकूण सात लोकल मुंबईत येणार आहेत. तर भारत हेव्ही इलेक्ट्रीकल्स अर्थात ‘भेल’ कंपनीच्याही एकूण 12 एसी लोकल मुंबईला मिळणार आहेत. सध्याच्या 12 डब्याच्या या एसी ट्रेनमध्ये 5964 प्रवासी बसू शकतात. तर नव्या एसी लोकलमध्ये 350 प्रवासी जादा (50 बसलेले आणि 300 उभे प्रवासी )बसू शकणार आहेत.