
सामना प्रतिनिधी। मुंबई
थकलेले शरीर, हाताला काम नाही. नुसतेच बसायचे किंवा चार पावले फिरून यायचे. या धावत्या शहरात आपल्याशी बोलायला कुणाकडेच वेळ नाही. अशावेळी फेसबुक किंवा ट्विटर चाळले की असंख्य मित्र भेटतात. त्यांच्याशी चॅट करता येते. अशी भावना व्यक्त केली आहे अंधेरीतील 78 वर्षीय आजोबांनी. असे अनेक आजोबा आता फेसबुक, ट्विटरपासून ते इन्स्टाग्रामपर्यंत सोशल मीडियाचा वापर सफाईदारपणे करू लागले आहेत. मोठय़ा संख्येने वृद्धांनी फेसबुकवर खाती उघडली असून आयुष्याच्या संध्याकाळी याच एका माध्यमावर त्यांना जगाच्या कानाकोपऱयात फिरता येत आहे. चार नवीन लोकांशी बोलता येत आहे.
कुणालाही डिस्टर्ब न करता मॅसेजेसद्वारे संपर्प साधता येतो. नातेवाईकांशीही बोलता येते. त्यामुळे आपण व्हॉट्सऍपवर ऑक्टिव्ह असल्याचे दादरच्या पोर्तुगीज चर्चच्या 80 वर्षीय यशवंत देशपांडे यांनी सांगितले. एकीकडे सोशल मीडियावर वृद्धांची संख्या वाढत असताना तरुणांची संख्या मात्र घटताना दिसत आहे. तब्बल दीड कोटी तरुणांनी फेसबुकचा नाद सोडल्याची माहिती अमेरिकेतील मार्केट रिसर्च कंपनीच्या एडिशन रिसर्चच्या अहवालातून समोर आली आहे. हा आकडा केवळ अमेरिकेतील तरुणांचा आहे. त्यामुळे जगातील तरुणांची संख्या याहून चौपट असण्याची शक्यता आहे. फेसबुकला रामराम ठोकणाऱया तरुणांमध्ये 12 ते 34 वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे.
व्हॉट्सऍपवरही वृद्ध ऑक्टिव्ह
वृद्ध नागरिक फेसबुकवरच नाही तर व्हॉट्सऍपवरही चांगलेच ऑक्टिव्ह आहेत. 78 वर्षीय प्रकाश नायक हे सामाजिक कामे मोठय़ा प्रमाणावर करतात. समन्वय संस्थेच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी एक व्हॉट्सऍप ग्रुपही तयार केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून कूपर, नाणावटीसारख्या हॉस्पिटल्समध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मे आय हेल्प हूँ’ हे अभियानही राबवण्यात येत आहे. व्हॉट्सऍप ग्रुपवरच त्यांना विविध आजारांची तसेच त्यावरील उपचारांची माहिती मिळत आहे.
अंधेरीतील आझाद नगर येथे समन्वय संस्थेच्या माध्यमातून फेसबुक, ट्विटर हाताळायला विनामूल्य शिकवले जात आहे. ही संस्था वृद्धांना त्याबाबतचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहे. इतकेच नाही तर मोबाईल हाताळायलाही इथे शिकवले जाते. 60 पासून 91 वर्षांचे आजोबाही येथे सोशल मीडिया कसा हाताळायचा हे शिकण्यासाठी येत असल्याचे अंधेरीच्या डी. एन. नगरात राहणाऱया प्रकाश नायक यांनी सांगितले.

























































